शिवचरित्रातुन काय शिकावे - एकदा वाचाच

शिवचरित्रातून काय शिकावे ?

शिवचरित्र हा पदोपदी प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे. शिवचरित्रातून आज आपणाला अनेक जीवनमूल्ये शिकता येण्यासारखी आहेत. शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांवर अनेक संकटे चालून आली. अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, सिद्दी जोहर, औरंगजेब अशा असंख्य शत्रूंशी महाराजांनी मोठ्या धैर्याने मुकाबला केला. म्हणजे शिवाजीमहाराज संकटसमयी रडणारे नव्हते, तर लढणारे होते. आज तरुणांनी संकटसमयी हताश, निराश न होता मोठ्या आत्मविश्‍वासाने संकटांविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिवचरित्रातून घ्यावी.

शिवाजीराजे प्रयत्नवादी होते; निराशावादी नव्हते. शिवचरित्रातून आज आपण प्रयत्नवाद शिकला पाहिजे. शिवाजीमहाराज निर्व्यसनी होते. त्यांचे सर्व मावळेही (सैनिक) निर्व्यसनी होते. त्यामुळेच शिवाजीराजे यशस्वी झाले. व्यसनाधीन लोक कधीच क्रांती करू शकत नाहीत. शिवरायांच्या जीवनचरित्रातून निर्व्यसनीपणा तरुणांनी शिकावा.

शिवाजीराजे चारित्र्यसंपन्न होते. "शत्रूंच्या स्त्रियांचादेखील त्यांनी आई-बहिणीप्रमाणे आदर केला. ""ज्याला यश पाहिजे त्याने स्त्रीअभिलाषा धरू नये. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे!'' असे उद्‌गार शिवरायांनी वेळोवेळी काढले. हिरकणीच्या निर्भीडपणाचा, साहसाचा आणि मातृप्रेमाचा सन्मान करताना शिवाजीमहाराज म्हणाले होते, ""ताई, सर्व संकटांवर मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत स्वराज्यात आहे, तोपर्यंत ते कोणालाही जिंकता येणार नाही.'' आपली आई राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला. आज आपण २१ व्या शतकाची भाषा बोलतो. खरेच, आज स्त्री स्वतंत्र आणि सुरक्षित आहे?

एत्तद्देशीयांचे, जनमानसाचे राज्य

शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणारे असंख्य मावळे बहुजनसमाजातून पुढे आले, कारण शिवाजीमहाराज समतावादी होते. शिवरायांचे राज्य रयतेचे, गरिबांचे, एत्तद्देशीयांचे, जनमानसाचे राज्य होते.

शिवरायांनी कधी भेदाभेद केला नाही. त्यामुळेच वीर बाजी पासलकर, कान्होजी जेधे, येसाजी कंक, कृष्णाजी बांदल, कावजी कोंढाळकर, जिवाजी महाले, शिवाजी काशीद, तानाजी मालुसरे,बाजीप्रभू देशपांडे, शेलारमामा, बहिर्जी नाईक, हिरोजी भोसले, मदारी मेहतर, सिद्दी इब्राहिम इत्यादी नरवीर शिवरायांसाठी पुढे आले. आज सर्वत्र अविश्‍वासाचे सावट आहे. एकमेकांबद्दल कमालीचे गैरसमज आहेत. अशा काळात शिवरायांची निष्ठावान फळी कशी असेल?
शिवरायांच्याकडे आप-पर भाव नव्हता. नागनाथ महाराला महाराजांनी पाटील केले. रामोशी समाजातील बहिर्जीला गुप्तहेर खात्याचे प्रमुख केले. हंबीरराव मोहिते यांना सरसेनापती केले. जिवाजी महाले या नाभिकाला अंगरक्षक केले. माळी, धनगर, मातंग, महार, कोळी, आग्री, शेणवी, मुसलमान या सर्वांना शिवरायांनी हक्क-अधिकार दिले. आज जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे राजकारण झाले आहे. अशा काळात शिवरायांच्या चरित्रातून "समता' शिकावी. शिवाजी महाराज निःस्वार्थी होते. ""एखाद्या गावच्या पाणवठ्यावरचे पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका, अन्यथा रयत म्हणेल, की मुघलच बरे. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा अन्यथा एखादा उंदीर पेटती वात तोंडात धरून धावत सुटेल आणि ती वात कडब्याच्या गंजीला लागून गंजी जळून खाक होईल, मग पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणार नाही. तेलवातीचे दिवे विझवून झोपा,'' अशी शिवरायांनी प्रजेची काळजी घेतली.

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालादेखील हात लावू नका, अशा सूचना शिवरायांनी दिल्या. आज मात्र शेतकऱ्यांच्या भाजीचे देठच काय "शेतकरीच' जिवंत ठेवायचा नाही, असे क्रूर राजकारण शिजत आहे. शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचा पुरवठा केला. ओसाड जमिनी ओलिताखाली आणल्या. वतनदारी-मिरासदारी बंद केली. पाणवठे, धरणे, तलाव बांधले. दुष्काळग्रस्तांना मदत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर शिवरायांचे हे कृषिधोरण अवलंबावे लागेल.

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका