दिल्लीचे तख्त गाजवतायत शिवरायांचे वारसदार

दिल्लीत आजपर्यंत शेकडो महाराष्ट्रियन नेते आपापल्या पक्षांचं, संस्थांचं ओझं सांभाळत कार्यमग्न होते. पुढेही राहतील. संसद भवन ते आपापला मतदारसंघ या सरळ रेषेच्या आजुबाजुला बरच काही असतं, संस्कृतीची एक महान परंपरा इथेच आजुबाजुला विखुरली आहे, इथेच कुठेतरी शौर्य, साहस, धड़क अन दरारा आपलाही होता याची जाणीव त्यांना जणू केव्हा झालीच नाही. निव्वळ पाट्या टाकायची कामे करत, नसलेला आवेश दाखवत राहिले. पण दिल्लीलाही मुठीत ठेवण्याची धमक राहुद्या पण साधी ताठर भाषाही केव्हा त्यांचेकडून निघायची म्हटली तर शपथ.....

पण सध्या ही रेषा जोरदार हुंकार भरत आहे. विखुरलेल्या इतिहासाच्या ओंजळी भरून त्यांचं अर्घ्य शिवविचारांना वाहिलें जात आहे. सद्विचारांशी एकरूप होत आहे. दिमाखदार गतकाळाशी सुसंवाद साधला जात आहे. कोल्हापुर राज्याचे युवराज संभाजीराजे छत्रपती आपल्या धीरगंभीर वृत्तीने हे इतिहासाचे सुवर्ण क्षण वेचताहेत. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर अवतरलेला राजाभिषेक सोहळ्याचा भव्य चित्ररथ हे त्याचेच द्योतक. नव्या पीढ़ीने पाहिलेला हा पहिलाच चित्ररथ जो थेट राजपथावर अवतरला.

राजधानीत साजरी झालेली वैभवशाली शिवजयंती म्हणजे त्याच प्रयासांचा दूसरा अंक. देशात गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षांत अनेक सरकारे आली नी गेली. त्यांच्या मांडीला मांडी अन खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रातले अनेक मातब्बर नेते बसले. पण दिल्ली दरबारी शिवजयंतीचा घोष उठावा ही इच्छा त्यातल्या कोणाचीही न व्हावी यातच आपलं अन त्यांचही अपयश दिसून येते. संसदेच्या सभागृहातून महाराष्ट्राच्या विकासाचे शेकडो निर्णय घेतले गेले असतील पण त्यातल्याच एखाद्या लेखनीमधुन शिवजयंती सारख्या 'राष्ट्रिय' उत्सवाच्या परवानगीचे शब्द केव्हा उमटले नाहीत. मात्र राजेंनी हे करून दाखवले.

पद, पैसा, लोकमत, प्रशासकीय अनुकूलता अनेकांकडे पुर्विही होती, आजही आहे. पण त्याचा योग्य वापर करत ध्येयपूर्ती करण्याची मनोवृत्ती मात्र संभाजीराजांनी दाखवली. राजधानीच्या रस्त्यांवर हत्तीच्या हौद्यात भरजरी अंबारीत स्वार झालेल्या शिवरायांना पाहण्याचं भाग्य देशाने अनुभवले. मावळी वेशातले असंख्य धारकरी, टाळ मृदंगाच्या नादात तल्लीन झालेले वारकरी, मराठमोळ्या पारंपारिक वेशात हाती ओवाळणीची तबके घेतलेल्या भगीनी.. हे सगळे नयनरम्य दृश्य होतं आजचं दिल्लीतलं.

देशाचे प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपतीही जेव्हा मेघडंबरीत विराजलेल्या शिवमूर्तिपुढे नतमस्तक होतात तेव्हा या एकूणच सोहळ्याचा थाट चार अंगुळी वर चढतो. आजच्या या लोकशाही शासन पद्धतीत दूर दिल्ली प्रदेशी आणखी कोणता मोठा सन्मान व्हावा शिवविचारांचा... ही विजय होता महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इथल्या सद्गुणी विचारांचा, इथल्या गड़कोटांचा, गडकोटांच्या निर्मात्याचा.....

युवराज संभाजीराजांच्या कार्यशीलतेचा प्रत्यत एरवीही अनेकदा आपणास आला आहे. टिका-टिप्पणी, वाद-प्रवाद, श्रेयवादापासून चार हात लांब रहात केवळ विचारांशी बांधील असलेलं व्यक्तित्व म्हणून अनेकांना आदरणीय ठरलेले राजे इतरांपेक्षा सहृदयी म्हणावे असेच. त्यांची स्तुती करणं हा उद्देश नव्हेच, केव्हाही नसेल पण चांगल्या कार्यातून प्रेरणा घेण्याची वृत्ती वाढावी इतकीच माफक अपेक्षा मात्र नक्कीच आहे. दिल्ली दरबारातल्या महाराष्ट्र देशीच्या मानकऱ्यांनी इतकं तरी जरूर करावं.....

-संतोष काशिद.

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका