इतिहास संशोधक निनादराव बेडेकर यांचा आज तिसरा स्मृतिदिन

इतिहास संशोधक शिवभूषणकार निनाद बेडेकर यांचा तृतीय स्मृतिदिन

ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवभूषणकार निनाद बेडेकर यांचे 10 मे 2015 रोजी आजारपणाने निधन झाले होते,आज त्यांच्या या अकाली दुःखद मृत्यूला तीन वर्ष पूर्ण होत आहेत

शालेय आणि कॉलेज शिक्षणानंतर त्यांनी किर्लोस्कर कमिन्स लिमिटेड येथे मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून नोकरी केली. १९८७ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत पूर्णवेळ मराठी इतिहास संशोधन आणि भटकंतीला सुरुवात केली. बेडेकरांनी देशविदेशांत सुमारे साडेतीन हजार व्याख्याने दिली आहेत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश; तसेच परदेशातील ७५ किल्ल्यांवर त्यांनी विशेष संशोधन केले होते. त्यांना फोटोग्राफीचीही आवड होती. शनिवारवाड्यातील 'लाइट अँड साउंड शो'चे तसेच 'पेशवाई' या मालिकेचे लिखाण त्यांनी केले होते. पुण्याच्या संभाजी बागेत किल्ले बनविण्याची स्पर्धा बेडेकरांच्या आग्रहानेच सुरू झाली होती.

सरदार रास्ते घराणे त्यांचे आजोळ असल्याने लहानपणापासूनच इतिहासाविषयी आपल्याला विशेष आवड निर्माण झाल्याचे, ते सांगत. भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे या संस्थांचे ते आजीव सदस्य तर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि महाराष्ट्र कलोपासक या संस्थांचे अध्यक्ष होते. इतरही अनेक संस्थांचे सदस्य आणि मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत होते. वर्तमानपत्रे, मासिके या माध्यमातून ते सातत्याने इतिहासावर लिखाण करत होते. ऐतिहासिक कागदपत्रांवर त्यांनी २५ शोधनिबंधही लिहिले होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणार्‍या अभ्यासकांच्या प्रभावळीत निनाद बेडेकर यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. जगभरात फिरून, पुरातन कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून, गड-किल्ले धुंडाळून ते शिवकालीन इतिहासात रममाण झाले होते. या अभ्यासासाठीच अरेबिक व पर्शियन भाषाही ते शिकले होते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते. शिवाजीची व्यवस्थापकीय कौशल्ये आजच्या 'एमबीए'वाल्यांना कळावीत म्हणून इंग्रजीतही त्यांनी भाषणे दिली होती. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी ते व्याख्यानमाला आयोजित करत.

वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या.

कवी भूषण या शिवरायांना समकालीन कवीने व्रज भाषेतील केलेली काव्ये निनादरावांनी संपादित केली..या काव्याचे सुमारे 600 छंद त्यांना मुखोद्गत होते.

शिवकालीन इतिहासाबद्दलची त्यांची ही तळमळ लक्षात घेऊन, शिवाजीच्या चरित्राची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी आणि गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

निनाद बेडेकर यांची ग्रंथसंपदा-

अजरामर उद्‌गार (ऐतिहासिक)
आदिलशाही फर्माने (ऐतिहासिक; सहलेखक - गजानन मेहंदळे, डॉ.रवींद्र लोणकर
गजकथा (ऐतिहासिक)
छत्रपती शिवाजी (चरित्र)
झंझावात (ऐतिहासिक)
थोरलं राजं सांगून गेलं (ऐतिहासिक ललित)
बखर पानिपत ची (मूळ लेखक - रघुनाथ यादव चित्रगुप्त, इ.स. १७६१)
विजयदुर्गाचे रहस्य (पर्यटनविषयक)
शिवभूषण (ऐतिहासिक)
समरांगण (बालसाहित्य)

इतिहासाचे गाढे अभ्यासक,मोडी तसेच पर्शियन लिपीचे व उर्दू,फारसी,अरेबियन भाषांचे जाणकार,ओघवत्या वक्तृत्वशैलीचे प्रभावी वक्ते,उत्तम लेखक,सृजनशील कवी,नवोदित इतिहास अभ्यासकांसाठी खुले विद्यापीठ असणारे 'निनादकाका' अकाली आपल्यातून निघून गेल्याने इतिहास क्षेत्रात निश्चितच एक पोकळी निर्माण झाली आहे...

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका