स्वराज्याचा देव्हारा असलेली रायगडावरील मेघडंबरी दुरावस्थेत
परसत्तांच्या दुष्टचक्रात पुरता फसलेल्या महाराष्ट्राला शिवछत्रपतींनी स्वातंत्र्याचा मंगल कलश दिला. शिवराज्य जणू रामराज्य झालं. बलदंड रायगडाच्या विस्तीर्ण माथ्यावर या मंगल राज्याची राजधानी उभारली. राजसभेची माती पवित्र झाली. मल्हारी मार्तण्डाच्या भंडाऱ्यासारखी लाखो मावळ्यांचा ललाटी शिंपण करून त्यांच्या आत्माभिमानाला सदैव जागतं ठेवत या मातीमधे अक्षरशः गवताचेही भाले होऊन शत्रुवर कोसळले. आजही तोच भाव, तीच आस्था, तीच भक्ती, तीच शक्ती इथं कायम आहे.
शिवराज्य मावळल्यावर मात्र हाच बलशाली दुर्ग भयान काळोखाच्या अंधाऱ्या रात्रींची सोबत घेत वैभवशाली आठवणी उगळत राहिला. शिवस्पर्शाने पुण्यवान झालेल्या सिंहासन चौथराही असाच एकाकीने ग्रासला गेला. शिवस्मृतिंचं एखादंतरी रोपटं इथ असावं म्हणून शिवपाइक धडपडु लागला. सुरुवातीला इथं शिवस्मृती म्हणून शिवरायांच्या मूर्तीचा आग्रह धरला गेला मात्र त्यात अपयश आले. शेवटी या पवित्र स्थानी किमान एक धातुची नक्षीदार मेघडंबरी उभारावी म्हणून शिवप्रेमींच्या भावनेचा दबाव वाढू लागला. अखेर नियमांच्या बऱ्याच कटकटी बाजूला करून ऑक्टोबर १९८० मधे छत्रपतींच्या सातारा गादीच्या वंशज राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मेघडंबरी उभारण्याबाबत तज्ञ सदस्यांची एक समीती नेमन्यात आली.
मेघडंबरी निर्मितीच्या पूर्व हालचाली, शासनाचा सहभाग, समितीमधील सदस्य, शिवप्रेमींची चळवळ, इतिहास तज्ञ व्यक्तीमतवांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष मेघडंबरी निर्माण, तिची स्थापना, उदघाटन आदी बाबींचा लेखाजोखा आपणास पुढील लिंकवर वाचावयास मिळेल. जिज्ञासु शिवप्रेमींनी तो जरूर वाचावा.
१९ एप्रिल १९८५ ला राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते रायगडवरील सिंहासन चौथऱ्यावर नक्षीदार मेघडंबरी स्थापन केली गेली. राजधानीच्या मुकुटावर सुंदर शिरपेच माळला. मेघडंबरीच्या रुपात स्वराज्याचा देव्हाराच स्थापन केला गेला. मात्र अवघ्या दोन वर्षांत मार्च १९८७ मधे ह्रदय पिळवटून टाकणारी एक अप्रिय घटना घडली. मेघडंबरीच्या वरच्या गोलाकार कंगोऱ्यास असलेली धातुच्या मण्यांची नक्षीदार माळ तुटली गेली. (की तोडली गेली..?) या संपूर्ण दुर्दैवी घटनेची नोंद कार्यकारी अभियंता महाड ( सां.बां ) यांच्याकडे मार्च १९८७ मधे " मऊवि/शाअप्र ८४२/१९८ नुसार करण्यात आली. ही माळ कोणी तोडली, तुटलेल्या मण्यांचं पुढे काय झालं, दोषींना शिक्षा झाली का ई. प्रश्नांचा खल आपणास पुढील लिंकवर वाचवयास भेटेल. जिज्ञासु शिवप्रेमींनी अवश्य वाचावा.
आता मुख्य मुद्द्यावर येऊ. मेघडंबरीच्या धातुशिल्पाला या धातुच्या मण्यांच्या माळेने देखनेपणाचं राजस रूपडं लाभले होते. रायगडसारख्या पुराणपुरुषाशी एकरूप होत मेघडंबरीचं हे पूर्ण धातुशिल्पच आपलं असं वेगळे स्थान आजही राखून आहे. सुमारे साडे सहा फुट उंचीच्या मेघडंबरीवरील मण्यांची माळ सहजी कोणाच्याही हाती लागणार नाही. पण तरीही दुर्दैवाने माळ तुटली. आता, घडलेल्या बाबीवर निष्फळ चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यातून हाती काहीही लागणार नाही. किंवा त्यातील दोषींवरही काही कार्रवाई होणार नाही. त्यामुळे तो मुद्दा बाजूला ठेवू. सध्या सरकारने 'रायगड प्राधिकरण' स्थापले आहे. आदरणीय संभाजीराजे छत्रपती हे या प्राधिकारणाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाने आपल्यासारख्या शिवप्रेमींच्या आशा उंचावल्या आहेत. हे शिवधन जपलं जाईल याची शास्वती वाढली आहे. राजे अहोरात्र त्यासाठी धडपड करत देशभर धावताहेत. गड़किल्ले जपले जावेत एवढा एकच उद्देश मनी ठेवत कार्यप्रवृत्त झाले आहेत. प्राधिकारणाच्या माध्यमातून रायगड़चं शास्त्रोक्त पद्धतीने अगदी कौतुकास्पद असं उत्खनन चालु आहे. अनेक अभ्यासनिय वस्तु सापडत आहेत. रायगड जणू बोलतो आहे असेच सध्याचे एकूण रूप आहे.
रायगडाच्या या बदलत्या स्पृहणीय काळात मेघडंबरी मात्र गेली ३१ वर्षे आपल्या मनातील वेदना घेऊन जगते आहे. पुरातत्व खात्याचा नियमानुसार जर एखाद्या ऐतिहासिक वास्तुची, स्थळाची, वस्तूची पूणर्रउभारणी किंवा त्यात दुरुस्ती करावयाची असेल तर मूळ वास्तु, वस्तु, स्थळाचे छायाचित्र किंवा रेखाचित्र उपलब्ध हवे. तरच त्याचे मुळाबरहुकुम उभारणी करता येईल. याचाच अर्थ जर एखाद्या किल्ल्याच्या नामशेष झालेल्या एखाद्या दरवाजाचं छायाचित्र उपलब्ध असेल तर ते द्वार पुन्हा उभारले जाऊ शकते. मेघडंबरी तर अगदी अलिकडचं म्हणजे ३३ वर्षापुर्वीचं शिल्प. मग हाच नियम या शिल्पाकृतीस का लागू होत नाही. मण्यांची माळ तुटल्यावर त्यातील अनेक मणी तत्क्षणी मुलांनी उचलले, काही मणी तिथल्या रखवालदाराने आपल्याकडे घेतले. सध्या हे मणी नेमके कुठे आहेत याविषयी काहीच माहिती उपलब्ध होत नाहिये.
सध्या १९८५ ते १९८७ दरम्यान या मेघडंबरीची धातुच्या माळेसहीत घेतलेली काही प्रकाशचित्र उपलब्ध आहेत. त्यात हे मणी अगदी व्यवस्थित आणि स्पष्ट दिसत असताना असे मणी नव्याने बनवून पुन्हा मेघडंबरीस जोड़णे अशक्य आहे का..? अगदी शक्य आहे. हुबेहुब मणी बनवून ते जोड़णे हे काही फार मोठे दिव्य नाही. बरं यात पुरातत्व खात्याच्या कोणत्याही नियमांचं कोणतेही उल्लंघन होत नाही. आपल्याकडे आवश्यक ती छायाचित्रे आहेत (पहा- लोकराज्य मासिकाच्या १९८५ च्या आवृत्तीचं मुखपृष्ठ, 'महाराष्ट्र' या महाराष्ट्र शासनाच्या १९९० मधील पर्यटनविषयक माहिती पुस्तीकेतील छायाचित्र) कगदोपत्री पुरावे आहेत, धातुचे मणी (बहुदा खात्याच्या स्वाधीन असावेत) आहेत. मग मेघडंबरीचं वस्तुशिल्प असं उघडं बोडकं का..? याची जबाबदारी कोणाची..? धातुच्या मण्यांची ही सुंदर माळ पुनश्च मेघडंबरीच्या धातुशिल्पास न जोडण्याचं कोणतही सबळ कारण सध्या तरी मला दिसत नाही. शासनाच्या विशेष करून पुरातत्व खात्याच्या चालढकल करण्याच्या अन लालफितीच्या कारभाराची दुर्दैवी शिकार मेघडंबरीसारखं सुंदर शिल्प झालं हे आपलं किती मोठं दुर्दैव...?
#आता_काय_करायला_हवं...
इतिहास घडलेल्या घटना या नेहमीच भविष्यासाठी मार्गदर्शक तत्वे घालून देतात. दुर्दैवाने आपण त्यातून काही शिकलो नाही हेच खरं. पण अजूनही वेळ गेली नाही. नव्हे आता तर अगदीच सुवर्णसंधी चालून आली आहे असे म्हटल्यास वावगे नाही. कारण सध्या पुरातन, ऐतिहासिक वास्तु-वस्तुंकडे पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोण सकारात्मक आहे. अनेक गड़किल्ले नव्याने उत्तमरीतीने सजवले जात आहेत. त्यात आपल्या सुदैवाने महाराष्ट्राच्या गड़किल्ल्यांचे ब्रैंड अम्बेसीडर म्हणून शिवरायांचे वंशज अन गड़किल्ल्यांकडे सुहृदयतेने पाहणारे करवीरचे युवराज संभाजीराजे छत्रपती कार्यरत आहेत. 'रायगड विकास प्राधिकरण' निर्माण होऊन त्याचं अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे आता धातुच्या मण्यांची तुटलेली माळ पुन्हा मेघडंबरीच्या अप्रतीम धातुशिल्पास जडवली जाईल ही आशा वाढली आहे.
या लेखाच्या माध्यमातून आदरणीय संभाजीराजे छत्रपती यांना कळकळीची विनंती आहे की स्वराज्याचा भंगलेला देव्हारा आपण स्वतः लक्ष देऊन पुनश्च सजवावा. दुरुस्तीचा लेप देत हे शिल्प पुन्हा एकवार देखणं करावं. तुटलेल्या मण्यांसारखीच नव्या माळेची झालर देत हे शिल्प पुनश्च खुलवावं. मेघडंबरीच्या धातुशिल्पास या राज्याभिषेक पूर्वी पूर्ववत पाहण्याची इच्छा करोडो शिवप्रेमींस आहे, त्यांना निराश करू नये. आमच्यासारख्या असंख्य शिवप्रेमींचं लक्ष आपल्या या कार्याकडे लागले आहे.
- संतोष काशिद.
santoshkashid43@gmail.com
Comments
Post a Comment