स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज - बालपण ते बलिदान

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांनी दिलेल्या दिव्य बलिदानापर्यंतचा इतिहास.
नक्की वाचा.

.                            *॥श्री॥*
______________________________________
*विषय: -* शंभुराजे - जन्म आणि बालपण
______________________________________

         मित्रांनो, आज आपण धर्मवार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बालपणाबद्दल जाणुन घेणार आहोत..
          श्री संभाजी महाराज म्हणटले की, आपणासमोर एक जाज्वल्य चित्र उभे राहते अतिशय धाडसी, पराक्रमी, शत्रुची प्रचंड चीड असणारे व काही अंशी रागीट, तापटस्वभावाचे, धीरगंभीर असणारे व हिमालयाला सुध्दा मागे टाकेल व खुजापणा वाटेल अशा अतिशय हिमतीने व प्रंचड स्वाभिमानाने *धर्मासाठी प्रखर बलिदान करणारे असे श्री संभाजीराजे..* परंतुमित्रांनो, आपण जर कधी याच संभाजीराजांच्या बालपणात डोकावले तर आपणास असे समजुन येईल की, याच संभाजी महाराजांवर नियतीने किती कठोर व अनन्वीत आघात केल होते..!!  म्हणुनच त्यांच्या या 'प्रखरतेचे' मुळ त्यांच्या बालपणातच दडलेले आहे असे म्हणण्यास आपणास वाव मिळतो व काही अंशी ते पटते देखील.
          ज्यावेळी शंभुराजांचा जन्म झाला त्यावेळेस भगवान श्री शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी झुंज देत होते.. पराक्रम गाजवत होते.. एक-एक गडकोट स्वराज्यात सामिल करुन स्वराज्याची हिंदवी वेल यशोशिखराकडे नेण्यात गुंतले होते.. अशातच या श्री शिवशंकराचे व आई श्रीतुळजाभवानीचे निस्सिम भक्त असणार्या व प्रत्यक्ष शिवाचा शिवांशच असणार्या शिवाजी महाराजांच्या घरी त्यांच्या अर्धांगिनी असणार्या सईबाईसाहेबांच्या पोटी हिंदवी स्वराज्याच्या रक्षकाने, विस्तारकाने व त्या म्लेंच्छ, परकीय यवनांच्या कर्दनकाळाने पुढे बघताच त्या परकीय यवनांना साक्षात कलीकाळच वाटावा अशा महारुद्राने.. जणु एका शिवांशाच्या पोटी दुसर्या शिवांशाने *"श्रीनृप शालिवाहन शके १५७९ हेमलंबी नाम संवत्सर ज्येष्ठ शुध्द द्वादशीला गुरुवारी म्हणजेच १४ मे १६५७ रोजी"* जन्म घेतला. 'राजेश्री सिवाजी राजे यास पुत्र जाहले. पुरंदरी जन्म जाहला.!'  रघुकुलामध्ये जणु या परकीय यवनरुपी रावणांचा नाश करणारा रामवंशच जन्मला.. त्या बाळराजांचं नाव ठेवण्यात आलं *'शंभुराजे..!  संभाजीराजे..!!'* जिजाऊंनी.. महाराजांनी तर कित्येक दिवस हा आनंदोत्सव साजरा केला.  सर्वांना गोडधोड खाऊ घातले. सगळीकडे साखरेच्या राशीच्या राशी वाटल्या.. त्या क्षणाला, त्या आनंदाला जणु या शब्दांच्या तटबंदीत बांधताच येत नाही.. असा तो आनंद.. म्हणाल केवढा तर आभाळएवढा..  आसमंताएवढा..!!
          श्री शिवछत्रपतींच्या नंतर हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनाचा वारस संभाजी महाराजांच्या रुपाने जन्मला. संभाजीराजांचे बालपण तसे कष्टप्रदच होते. आयुष्यभर नियतीने त्यांना सुखाचे अगदी मोजकेच क्षण दिले नाहीतर त्यांच्या पदरी कायम जळता निखाराच बांधला.. हिच परिस्थिती त्यांच्या बालपणीची..  या आपल्या बाळराजांनी आयुष्यभर दुष्मनांना, परकीयांना पराभवाचे पाणी पाजले व प्रजेचे पालन, पोषण व रक्षण करुन त्यांच्यावर महाराजसाहेबांनंतर छत्रपती म्हणुन आईपणाचे छत्र धरले, त्यांच्याच वाट्याला त्यांच्या जन्मदेणार्या जन्मदात्या आईचे अमृततुल्य पोटभर दुधसुध्दा आले नाही हो.!! शंभुराजांचा जन्म झाल्यानंतर लगेचच त्यांच्या मातेला म्हणजेच सईबाईसाहेबांना आजाराने जखडले. त्या आजाराच्या मार्याने सईबाईंच्या अंगावरची दुधगंगा आटुन गेली व अंगावरचे दुध कमी झाले. आजारपणामुळे संभाजीराजांना आईपासुन, तिच्या उबदार मायेपासुन दुर रहावे लागले.. जणु वासरापासुन त्याची जन्म देणारी गोमाताच दुरावली.. त्यांना मातेचे पोटभर दुध मिळेना.. बाळाचे पोट भरेणा हि गोष्ट वैद्यांच्या लक्षात आली त्यांनी ती जिजाऊंच्या कानावर घातली.. राजमाता जिजाऊ काळजीत पडल्या.. काय करायचे हे त्यांच्या लक्षात आले आणि लगेचच त्यांनी शंभुबाळासाठी दुधआई शोधण्याचे आदेश दिले.. माणसे गड उतरुन कामाला लागली व पुण्याच्या दक्षिणेला नसरापुर जवळ 'कापुरवहाळ' या गावी हि दुधआई मिळाली. ती दुधआई म्हणजे तिथल्या तुकोजी गाडे पाटलांची पत्नी *'धाराई'* ही होय. आपले शंभुराजे याच धाराईच्या दुग्धरुपी अमृतधारा प्राशुन लहानाचे मोठे झाले.(महाराजांनी या धाराईला वार्षिक २६ होनांची तैनाती करुन दिली व पुढे तीच्या पुत्रांना देखील स्वराज्याच्या चाकरीत घेतले)
          शंभुराजे आता खेळु लागले, बागडु लागले, रांगु लागले. आता बाळराजे दोन-सव्वादोन वर्षांचे झाले व आत्ता कुठे ते या खेळण्याचा, बागडण्याचा, बालपणाचा आनंद घेतायत न घेतायत तोच नियतीने पुन्हा एकदा त्यांच्या बालपणाच्या आनंदावर विरजण घातले. बाळराजांची जन्मदाती माता सईबाईसाहेब या भरला संसार तसाच टाकुन, भरल्या मळवटासह शिवप्रभुंचा संसार अर्धवट सोडुन, लहानग्या निरागस शंभुबाळाला पोरकं करुन *भाद्रपद वद्य चतुर्दशी या दिवशी, ५ सप्टेंबर १६५९ रोजी* हे सुर्यमंडळ भेदुन या इहलोकातुन परलोकी निघुन गेल्या व शंभुराजे आपल्या जन्मदात्या आईच्या मायेला कायमचे पोरके झाले. त्यांच्या वाट्याला पुन्हा दु:खच आले. आता बाळराजांना वेळ देऊ शकणारी.. मायेच्या पदराखाली घेणारी एकच व्यक्ति होती ती म्हणजे राजमाता जिजाऊ.. कारण, शिवाजी महाराज बर्याचदा स्वराज्याच्या मोहिमांवर, लढायांवर जात..  परंतु ज्या मातेने हे आभाळाएवढे शिवाजी महाराज आपल्या मायेच्या पंखाखाली घेऊन सांभाळले.. वाढवले..  त्याच जिजामातांनी आता या लहानशा शंभुराजांनाही आपल्या आभाळा एवढ्या मायेच्या पंखाखाली घेऊन मायेची ऊब दिली व पालण, पोषण केले.
          का हो.. *!!*  आपण कधी तरी विचार केला का..??  त्या कोवळ्या मनाचा.. ज्याला लहानपणी ना आईच्या प्रेमाची ऊब मिळाली.. ना तिचे पोटभर दुध मिळाले..  वडील सतत स्वराज्याच्या कारभारामुळे लढायांमध्ये, मोहिमांमध्ये गुंतलेले.. त्यामुळे वडीलांचा सहवास लहानपणी तसा कमीच मिळाला. 'कसे गेले असेल हो त्या शंभुराजांचे बालपण..?'  त्या माया करणार्या आई विना..!!  त्या वडील असणार्या महाराजसाहेबां विना..!!  कितीतरी वेळा त्यांच्याविना यांचा जीव कासाविस झाला असेल..!!  जसे एखादे वासरु त्याच्या आईपासुन अलग झाल्यावर जिवाच्या आकांताने हंबरडा फोडते व आईला हाका मारते ना.. अगदी तसेच शुंभुराजांनी.. त्या बाळराजांनी आपल्या आईसाठी त्या मातेच्या मायेसाठी कितीतरी वेळा जीवाचा आकांत करुन त्या चुकलेल्या वासराप्रमाणे टाहो फोडला असेल..!!   या व अशाच कितीतरी फक्त विचारांनी मनामध्ये भावनांचं काहुर माजुन येतं व  शंभुराजांचं ते दु:ख स्मरले की डोळ्यातील अश्रुंनाही थांबवणं.. त्यांना पापण्यांच्या तटबंदीत अडवुन धरणं कठीण व अशक्यप्राय होऊन जातं.. ते अश्रु या सर्व तटबंदी भेदुन आपसुकच भावनांना वाट मोकळी करुन देतात व मन भरुन येतं..  पण मित्रांनो.. आपल्या शंभुबाळांनी त्या समर्थ  धर्मवीरांनी..  हे सर्व प्रत्यक्ष अनुभवलंय..  भोगलंय..  नव्हे तर या नियतीच्या हातोड्याचा मारा त्यांनी कितीतरी वेळ ऐरण होऊन सोसलाय..!!   बालपणी आईचे दुध नाही..  कळतेपणी आईची माया करायला आईच नाही..  जाणतेपणी आधार काय तो फक्त राजमाता जिजाऊंचा व अवघ्या हिंदवी स्वराज्याचे मायबाप असणार्या आबासाहेबांचा..!!

*शिक्षण:-*
          नियतीचे घाव ऐरण होऊन सोसत सोसत बाळराजे..  आता मोठे होत होते. आता त्यांना नितांत आवश्यकता व गरजही होती ती हिंदवी स्वराज्याचा कारभार यशस्वीरित्या चालवण्यासाठी आवश्यक असणार्या संस्कारांची, शिक्षणाची व प्रशिक्षणाची आणि श्री शिवाजी महाराज स्वराज्य कारभारात सतत व्यस्त असल्या कारणाने ओघाने व सहाजिकच ती सर्व जबाबदारी येऊन पडली ती राजमाता जिजाऊ यांच्या खांद्यावर व ती त्या यशस्वी रित्या पार ही पाडत होत्या.. जिजामाता बाळराजेंना रामायण व महाभारतातील प्रसंग सांगुन त्यांच्यातुन योग्य तो बोध त्यांना शिकवत व या ऐतिहासिक महाभारतासारखेच त्या बाळराजांना *त्यांचे वडील असणार्या भगवान श्री शिवछत्रपतींच्या रोमहर्षक जिवंत व त्यावेळी सुरु असणार्या "शिवभारताच्या" कथा हि ऐकवीत."* पित्याच्या म्हणजेच आपल्या आबासाहेबांच्या पराक्रमाच्या कथा ऐकुन त्यांना त्यांच्यासारखाच पराक्रम करण्याचे स्फुरण मिळे व कदाचित त्यांनी याच वेळी *"राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य.."* हे मनोमनी ठरवले ही  असावे.  अशा या घरच्या संस्कारा बरोबरच आऊसाहेबांनी 'केशवभट व उमाजी पंडीत' यांनाही बाळराजांचे गुरु म्हणुन नियुक्त केले होते. त्यांनी संभाजी महाराजांना रामायण, महाभारत बोधरुपाने व संस्कृत लिहायला वाचायला शिकवले. केशवभट पुरोहितांनी त्यांना 'प्रयोगरुप रामायण शिकवले.' याचबरोबर त्याना इतरही शिक्षण व प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यात त्यांना लेखन, वाचन, विद्याभ्यास इ. शिक्षण देण्यात आले होते. या सर्वात बाळराजे गुरुंच्या व राजमातांच्या मार्गदर्शनाखाली हळुहळु तयार होऊ लागले.

*सैनिकी व राजकीय शिक्षण:-*
          सैनिकी शिक्षणासाठी महाराजांनी जसे जिजामातांच्या देखरेखीखाली शिक्षण घेतले तसेच बाळराजेंनाही जिजामातांनी आपल्या देखरेखीखाली तयार करण्यास सुरवात केली. यावेळी यामध्ये मात्र त्यांच्या जोडीला शिवाजी महाराजांसारखे युध्दनितीने निपुणव राजकीय डावपेचात निष्णात असे वडील होते व ते लाभल्याने त्याचाही फायदा त्यांना या शिक्षणात झाला. महाराज बाळराजेंना लहान सहान मोहिमांवर नेत व त्याचे नेतृत्व त्यांच्याकडे देत जेणेकरुन त्यांचे नेतृत्वगुण वाढावेत.. कधीकधी एखाद्या आघाडीवर नेत जेणेकरुन त्यांचे युध्दकौशल्य सुधारावे.. असेच एक-एक करत शंभुराजे राजमाता जिजाऊंच्या व महाराजांच्या मुशीत तरबेज  राजकारणात, यध्दकौशल्यात, राजकीय डावपेचात, विद्याभ्यासात निपुण होऊ लागले. अशाप्रकारे बाळराजे आता बाळसे टाकुन लहानाचे मोठ होऊ लागले व राज्यकारभार व स्वराज्याचे राजकारण त्यांना खुणावु लागले. आता ते तरुणपणाच्या उमद्या वयाकडे वाटचाल करत होते आणि या ऐन उमेदीच्या तरुण वयातच आपले बाळराजे या हिंदवी स्वराज्याच्या राजकीय विश्वात पदार्पण करण्यास तयार होत होते आणि तिथे त्यांच्या आयुष्याच्या या नव्या पर्वात त्यांचे गुरु व मार्गदर्शक होते दस्तुरखुद्द  'पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज..!!'
          *अशा या राजमाता जिजाऊंसाठी दुधावरची साय असणार्या बाळराजांची..  सईबाईसाहेबांसाठी त्यांचं काळीज असणार्या शंभुराजांची..  आसमंता ऐवढे कर्तुत्व असणार्या भगवान श्री शिवछत्रपतींच्या दुर्दम्य अशा शिवपुत्राची..  व श्री शहाजीराजांनी संकल्पिलेल्या..  श्री शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सह्याद्रीसम संरक्षकाची व हिमालयासारख्या वज्रनिर्धाराने परम पवित्र हिंदु धर्मासाठी प्रखर बलिदान करुन अवघ्या हिन्दुस्थानाला स्फुर्ती प्रेरणादायी ठरलेल्या तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या बाळराजांची, शंभुराजांची म्हणजेच..*
*'धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज'*
*यांच्या बालपणीची हि  कहाणी..!!*

                       ॥इतिश्री॥
______________________________________
*@ संदर्भ:-*

१) *शिवपुत्र संभाजी:-* डॉ.कमल गोखले
२) *शंभुराजे:-* प्रा.सु.ग.शेवडे
३) *मराठ्यांचा इतिहास(खंड १):-* अ.रा.कुलकर्णी, ग.ह.खरे
४) *राजा शंभुछत्रपती:-* शिवकथाकार विजयराव देशमुख
५) *ज्वलज्वलतेजस संभाजीराजा:-* डॉ.सदाशिव शिवदे
६) *टिपण:-* इतिहासावरील काही टिपण
______________________________________
#@संकलन:-

                     ओमकार माने
        (श्री शिवप्रतिष्ठन हिन्दुस्थान)
                     कराड विभाग

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका