महाराष्ट्राला नवा किल्ला सापडल्याच्या बातमीमागची वस्तुस्थिती.
महाराष्ट्राला एक नवा किल्ला सापडल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आलेली.
जाणुन घ्या त्यामागची सत्य परिस्थिती.
ढवळगड - एक खुलासा
पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात वसलेल्या ढवळगड ह्या किल्ल्यावरील अवशेषांची नोंद घेऊन व तो दुर्गप्रेमींसाठी प्रकाशात आणल्याबद्दल अनेक जणांचे अभिनंदनाचे फोन येत आहेत. ढवळगड किल्ल्यावर मी फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा दिलेल्या भेटीत किल्ल्यावरचे तटबंदी, पडलेला दरवाजा, मेटांच्या जागा, पाण्याची टाकी, मंदिर इत्यादी अवशेष दिसल्यावर इतक्या सुंदर किल्ल्याच्या अवशेषांची शास्त्रशुद्ध रीतीने तपासणी करून व त्यावर अभ्यास करून तो दुर्गप्रेमींसमोर मांडला पाहिजे असं लक्षात आल्याने त्या कामात डॉ. सचिन जोशी यांची मदत घेण्यात आली. दि. 19 मे 2018 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळात सादर केलेल्या पुरंदर तालुक्यातील ढवळगड किल्ल्याच्या सादरीकरणाला प्रोत्साहन देऊन आमचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल आम्ही दुर्गमित्रांचे आभारी आहोत. काल भारत इतिहास संशोधक मंडळातील पाक्षिक सभेचे निमंत्रण व ऑनलाइन वृत्तपत्र, Whatsapp वरील काही मेसेजेस व वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या यावरून अनेक दुर्गप्रेमी मित्रांनी अभिनंदन केले. तसेच काही मित्रांनी फेसबुकवर ढवळगडाच्या "शोध" या शब्दाबद्दल विचारणा केली. त्याबाबत हा छोटासा खुलासा.
1. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की ढवळगड हा किल्ला आधीपासूनच त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. तो हरविला होता असे आमचे कोणाचेही मत नाही. गडावरील ढवळेश्वर मंदिर व ढवळगड संपूर्ण पुरंदर तालुक्यात प्रसिद्ध असल्याने स्थानिक ग्रामस्थ बांधवांनाही ते माहीत आहेच. आंबळी येथील ग्रामस्थांना याबद्दल माहिती होती हे आम्ही आमच्या सादरीकरणात सांगितले होते. तसेच सादरीकरण झाल्यावर आंबळी ग्रामस्थांचे आभारही मानले. त्यामुळे आम्ही हा किल्ला शोधलेला नाही.
2. संशोधन निबंध सादरीकरणाच्या वेळी आम्ही किल्ला शोधला असा कुठेही दावा न करता ढवळगडाच्या वास्तूंचा व अवशेषांचा सर्वांगीण अभ्यास केला आहे असे मांडले होते. ढवळगडाला "किल्ला" या स्थापत्यप्रकाराची सर्व परिमाणे वापरून तो दुर्गप्रेमींना परिचित करून देण्याचा प्रयत्न आहे असेच नमूद केले होते. आमच्या रिसर्च पेपरचा मथळा जरी "शोध ढवळगडाचा" असा होता. पण त्याविषयीचा खुलासा पाक्षिक सभेच्या सुरुवातीलाच केला होता. त्यावरील अवशेषांची नोंद घेऊन भटक्यांच्या नकाशावर आणण्याचे काम आम्ही केले इतकंच.
3. काही दुर्गप्रेमी मित्रांनी शिवाजीराव एक्के सरांच्या " पुरंदरचे धुरंधर"पुस्तकामध्ये ढवळगडाचा फोटो सकट उल्लेख आल्याचा खुलासा केला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्के सर स्वतः या सादरीकरणाच्या वेळी त्या सभागृहात उपस्थित होते. त्यांनी यावेळी आमच्या संशोधनाविषयी कोणताही आक्षेप घेतला नाही. उलट त्यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी आमच्या या अभ्यासबद्दल शाबासकीची थापच दिली.एक्के सरांच्या पुस्तकात ढवळगडचा फक्त एक फोटो आहे. पण किल्ल्याची संपूर्ण माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही.याच बरोबर जेष्ठ दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे सर, आनंद पाळंदे सर, पुणे जिल्ह्यातील किल्ले या विषयावर लिखाण केलेले तापकीर सर यांच्या पुस्तकात या किल्ल्याची माहिती आलेली नाही.
एक्के सरांच्या पुस्तकात व इतर काही पुस्तकांमध्ये ढवळगडाचे निश्चित वर्णन आढळून न आल्याने आम्ही त्याच्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून, त्याची मोजमापे घेऊन, त्याची शास्त्रशुद्ध रेखाटने ( Drawings) करून, त्यांची पुरातत्वीय पद्धतीने नोंद घेऊन ती संशोधनाच्या व्यासपीठावर मांडली होती. तसेच त्या किल्ल्याचा कालखंड व तेथील सर्व अवशेष याची माहिती लोकांसमोर आणली. एक्के सरांच्या म्हणण्यानुसार त्या किल्ल्याची ऐतिहासिक दृष्ट्या (घटना वगैरे) फारशी माहिती उपलब्ध नसल्याने आणि त्यांच्या मूळ संशोधनाचा विषय पुरंदर परिसर हा असल्याने त्यांनी ढवळगडावर लिखाण केले नाही. त्यामुळे कदाचित त्या पुस्तकात त्या फोटोपुरता व उल्लेखापुरता ढवळगड मर्यादित राहिला व त्यावरील अवशेषांवर विस्तृत लिखाण झाले नसल्याने त्याची नोंद दुर्गप्रेमींच्या नकाशावर आली नसावी. पण त्यांनी यासंदर्भात केलेल्या प्रदीर्घ कामाचा आदर आहे.
४. मग आता आम्ही काय वेगळं केलं ??
तर याआधी ढवळगडावर पुरातत्वीय दृष्ट्या शास्त्रशुद्ध संशोधन झालेले नव्हते व ते कुठेही प्रकाशित नसल्याने ढवळगड हा तमाम दुर्गप्रेमींच्या तसा विस्मृतीतच गेला होता. ढवळगडाला आजवर अनेकांनी विविध कारणासाठी भेट दिली असेलही पण त्याच्या सर्व अवशेषांचा अभ्यास व त्यांची नोंद कुठेही प्रकाशित झालेली नव्हती. त्यामुळे हा किल्ला ट्रेकर्सच्या व दुर्गप्रेमींच्या यादीत समाविष्ट झाला नव्हता. तसेच पुणे जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्येही ढवळगडाची "किल्ला" म्हणून नोंद नाही. त्यामुळे कदाचित आमच्या अभ्यासानंतर आता याची नोंद इतर किल्ल्यांप्रमाणे ‘किल्ला’ म्हणून शासकीय गॅझेटियरमध्ये होऊ शकेल.
५. आम्ही काय नवीन केले ?
ढवळगड किल्ल्याचा अभ्यास करताना गडावर पुढील अवशेष दिसून आले. पाण्याची दोन टाकी(त्यापैकी एक खांब टाके), गडाबाहेर एक टाके, मेट्याच्या दोन जागा, तेथील गणेश मंदिर आणि पाण्याचे टाके, दुसऱ्या मेटावरील चुन्याचा घाणा, तेथील राहत्या घरांचे अवशेष, गडाची तटबंदी. त्यात उभे असलेले बुरुज, उभे नसलेले बुरुज, देवडी, कमानीचे दगड, तटबंदीमध्ये बांधलेली खोली ( तेथे सध्या मंदिर झाले आहे), गडावरील विटांची, दगडाची बांधकामे, तेथे मिळालेले खापरांचे तुकडे, इ. अवशेषांची आम्ही तेथे जाऊन नोंद केली. सर्व वास्तुंची रेखाटने तयार केली. हे काम यापूर्वी कोणी केल्याचे आमच्या तरी माहितीत नाही. किल्ल्याचा उल्लेख त्रोटक स्वरुपात अनेक अभ्यासकांनी केला होता. उदा. श्री. कृ.वा. पुरंदरे, आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, श्री. एक्के सर, श्री. अभिजित बेल्हेकर इ. पण वर उल्लेख केलेल्या अवशेषांचे पुरातत्वीय सर्वेक्षण आणि त्याचा सखोल अभ्यास आजपर्यंत झालेला नव्हता. तो करण्याचा प्रयत्न आम्ही केला.
काही वृत्तपत्रांच्या बातमीमध्ये आणि फेसबुक पोस्टमध्ये चुकून "किल्ला शोधला" हे शब्द वापरले गेल्याने कदाचीत काही दुर्गप्रेमींचा गैरसमज झाला असावा. त्या बातमीतील व पोस्टमधील शब्दांमुळे जो गैरसमज झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळे ती पोस्ट आम्ही लगेचच दुरुस्त केली.
आमच्या सादरीकरणाच्या वेळी अनेक भटक्या मित्रांनी उपस्थिती लावली तसेच त्यांनी संशोधनाविषयीचे वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यांना समाधानकारक उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला.
त्यामुळे शेवटी हाच खुलासा करावासा वाटतो की ढवळगड हा किल्ला आम्ही शोधला नसून त्याच्या वास्तूंची पुरातत्वीय अंगाने नोंद घेऊन, त्यांची रेखाटने करून व त्या नकाशावर मांडून त्या लोकांसमोर आणल्या व ढवळगड हा काहीसा विस्मृतीत गेलेला किल्ला पुन्हा एकदा भटक्यांच्या नकाशावर आणला. ज्या दुर्गप्रेमींना हा किल्ला माहीत नव्हता त्यांनी आता ढवळगड आपल्या यादीत नोंदवल्याने या गोष्टीचा आम्हाला मनस्वी आनंद आहे व आमच्या अभ्यासाचं तसेच किल्ल्याच्या अवशेषांची नोंद घेण्याच्या कष्टाचं चीज झालं आहे. त्यामुळे हा शोध नसून विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची नोंद घेऊन तो भटक्यांच्या नकाशावर आणल्याचा खुलासा मी यानिमित्ताने करतो व या चर्चेला पूर्णविराम देतो.
- ओंकार ओक
Comments
Post a Comment