गडकिल्ले कसे पहावेत : वाचा विशेष लेख
आज आपण जाणुन घेणार आहोत गडकिल्ले पाहण्याची तंत्रशुद्ध पद्धत.
३०-३५ वर्षांमध्ये दुर्गभ्रमण, गिरीसंचार, निसर्ग अभ्यास आदी गोष्टींची तरुण पिढीला वाढती गोडी लागली आहे. ही निश्चितपणे चांगलीच गोष्ट आहे. किल्ल्यांवर जाणारे अनेक असतात, पण किल्ल्यांचा अभ्यास करून किल्ले समजावून घेणारे तुलनेने फारच कमी असतात. ' People see, but Don't observe! ' हे हळूहळू पटू लागतं. गड-कोट-किल्ले-दुर्ग-जंजिरे गढ्या यांना भेटी देणारे अनेक प्रकारचे असतात. काही जण अंगातील रग जिरवायला किल्ल्यांवर (विशेषत: डोंगरी किल्ल्यांवर) जातात. काही जण हिमालयातील गिर्यारोहण मोहिमांसाठी सराव हवा म्हणून किल्ल्यांवर जातात. काही जणांना इथला इतिहास साद घालतो. म्हणून इतिहासाचे साक्षीदार पाहण्यात त्यांना अधिक रस असतो. मुक्त स्वातंत्र्य आणि हुल्लडबाजी करायला काहीजण बाहेर पडतात नि गड-दुर्ग-किल्ले इथे पोहोचतात. पण यांची संख्या तुलनेनं कमी आहे. अशा वेगवेगळ्या विचारांचे नि आचारांचे लोक सध्या गड कोट-किल्ल्यांवर जातात.
किल्ल्यांवर पाहायचं काय? एकेकाळी बांधलेले हे दुर्ग आता ढासळल्याने तिथे पाहण्यासारखं काही असतं तरी का? आता विमान आणि दूरनियंत्रित क्षेपणास्त्र उपग्रहांच्या टेहळणींमुळे मध्ययुगीन इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावणारे हे बुलंद, बेलाग नि बळकट किल्ले आता कशाला नीट पाहायचे, असे प्रश्न अनेकांच्या मनात येत असतीलसुद्धा. पण आपल्या इतिहासाचे हे गौरवशाली साक्षीदार आहेत. पुढील पिढ्यांनी अभिमानानं सांगावं, अशा अनेक घटना इथे घडल्या आहेत. आपल्याच पूर्वजांनी घाम गाळून हे किल्ले उभारले आणि रक्ताचा सडा शिंपून ते टिकवले ती ही धारातीर्थे आहेत. * कोणत्याही किल्ल्यावर जाण्याआधी त्या किल्ल्याचं भौगोलिक स्थान, तिथला भूगोल-इतिहास, निसर्ग अशा गोष्टींबद्दल पूर्वसूरींनी लिहून ठेवलेलं आपण वाचायला हवं. त्याची टिपणं काढून बरोबर न्यायला हवीत. * किल्ल्याची रचना, तिथले तट-बुरूज, वास्तू, ऐतिहासिक महत्त्वाच्या जागा तिथून दिसणारा आसमंत हे सारं चिकित्सक नजरेन पाहायला हवं. जाऊ तिथे खाऊ आणि खाऊ तिथेच घाण करू ही वृत्ती टाळायला हवी. * किल्ल्यांवरील वास्तू अवशेषांवर खडू-कोळसा-चुना, विटा, तेलरंग यांचा वापर करत आपली नावं किंवा अन्य मजकूर चितारून ठेवणं, हा अक्षम्य गुन्हा आहे, हे मनावर ठसवायला हवं. आपण असे गैरप्रकार करू नयेत आणि दुसरे कोणी करत असतील, तर त्यांना थांबवायला हवं. किल्ल्यांवरील पाणवठे, वृक्ष, झाडी, तट-बुरूज व इमारतींची बांधकाम यांना नुकसान पोहोचणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घ्यायला हवी.
thank you.
ReplyDelete